औषध विक्रेत्यांवर होणारे खोटे आरोप थांबवा, अन्यथा औषध पेढ्या बंद - केमिस्ट असोसिएशनचा इशारा;

संग्रामपूर : औषध विक्रेत्यांवर होणारे खोटे आरोप थांबवा, अन्यथा औषध पेढ्या बंद - केमिस्ट असोसिएशनचा इशारा; 
दि. 16 एप्रिल 2025

संग्रामपूर : तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने तहसीलदार, संग्रामपूर यांना निवेदन देऊन होणाऱ्या आधारहीन व बदनामीकारक आरोपांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एकीकडे कारवाई व दुसरीकडे बदनामी अशी दुहेरी ससेहोलपट सुरु आहे. 


# *नियमांचे पालन*: संघटनेचे सर्व सभासद शासनाच्या नियमांनुसार व ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टनुसार व्यवसाय करतात. 24 तास सेवा, बिलासह खरेदी-विक्री व औषधांच्या साठवणुकीचे सर्व नियम पाळले जातात.
# *आदर्श तालुका*: संग्रामपूर तालुका महाराष्ट्रातील अग्रणी तालुका असून औषध विक्रेत्यांनी जनसेवेत व रुग्णसेवेत आदर्श स्थापित केला आहे. त्यामुळे तालुक्याचा राज्य पातळीवर गौरव झाला आहे.
# *बिनबुडाचे आरोप*: मागील काही काळापासून स्वप्निल देशमुख हे हेतुपुरस्सर व पूर्वग्रहदूषित वृत्तीने 'नशेची औषधे, गुंगी आणणारी औषधे, अवैध औषधे विकली जातात' असे खोटे आरोप लावून सामाजिक प्रतिष्ठेला धक्का लावत आहेत.
# *प्रशासनाची चौकशी*: या आरोपांनंतर अन्न व औषध प्रशासनाने संग्रामपूर तालुक्यात दोन वेळा कार्यशाळा घेऊन तपासणी केली. *सर्व आरोप खोटे असल्याचे सिद्ध झाले.* कोणत्याही गैरप्रकार, अवैध औषध किंवा नशेची औषधे आढळली नाहीत. किरकोळ त्रुटींसाठी काही पेढ्यांवर नियमाप्रमाणे कारवाई झाली, ती मात्र ड्रग ॲक्टच्या पूर्ततेसाठी होती.

*संघटनेची भूमिका*:  
"आम्ही सामाजिक आरोग्याची जबाबदारी जपत व्यवसाय करतो. आमच्यावर होणारे खोटे आरोप व बदनामी आम्ही सहन करणार नाही. आम्ही स्वतः चुकीच्या गोष्टींचे समर्थन करत नाही. तसे काही आढळ्यास कारवाईला सहकार्य करू. मात्र केवळ बदनामीच्या हेतूने समाजात विषमता निर्माण करणे थांबवावे," अशी मागणी संघटनेने केली आहे.

*औषध विक्री बंद करण्याचा इशारा*:  
"सामाजिक अवहेलना व बदनामी थांबली नाही, तर आम्ही आमच्या औषध पेढ्या बंद करू. त्यानंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीला प्रशासन जबाबदार राहील," असा स्पष्ट इशारा संग्रामपूर तालुका औषध विक्रेते संघटनेने दिला आहे.

---

*प्रशासनाची भूमिका*

*प्रशांत पाटील, तहसीलदार संग्रामपूर* यांनी सांगितले,  
"फार्मासिस्ट संघटनेने निवेदन दिले असून त्यांच्यावर आरोप होणे दुर्दैवी आहे. यासंबंधी तपासण्या व कारवाई सुरू आहे. FDA चे अधिकारी गजानन घिरके यांनी याबाबत अवगत केले आहे. तालुक्यात फार्मासिस्ट संघटनेने समाजहिताची भूमिका घेतली आहे. आरोपांच्या कडे दुर्लक्ष करून नियमांच्या अधीन राहून फार्मासिस्ट यांनी आपलं आरोग्य सेवेचे कार्य सुरु ठेवावे."

*चंद्रशेखर मारोडे, तालुका आरोग्य अधिकारी संग्रामपूर* म्हणाले,  
"संग्रामपूर तालुक्यात जिथे डॉक्टर नाहीत अशा ठिकाणी आरोग्य यंत्रणेला फार्मासिस्ट यांची मोलाची मदत होते. फार्मासिस्ट हा आरोग्य सेवेतील महत्त्वाचा दुवा आहे. त्यांनी आपले आरोग्य सेवेचे काम निरंतर करत रहावे."

*गजानन गिरके, सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन* यांनी स्पष्ट केले,  
" मार्च महिन्यात संग्रामपूर तालुक्यात तपासण्या सुरू केल्या आहेत. याबाबत स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांना अवगत करण्यात आले आहे. यासंदर्भात आलेल्या बातम्यांच्या अनुषंगाने, बातमीत नमूद केल्याप्रमाणे झोपेच्या गोळ्या, गर्भपाताची औषधे, गुंगी आणणारी औषधे तपासणीमध्ये आढळून आलेली नाहीत. अन्य काही त्रुटी आढळलेल्या पेढ्यांवर औषध सौंदर्यप्रसाधने कायदा 1940 व त्या अंतर्गत नियम 1945 नुसार कारवाई सुद्धा करण्यात आली आहे."