राजू बडेरे
(मुख्य संपादक)
मोबाईल पद्वारे ई - पिक पाहणी करण्यासाठी सहा दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून त्यानुसार आता शेतकर्यांनी येत्या २० सप्टेंबरपर्यंत मोबाईल ॲप द्वारे ई - पिक पाहणी करण्याचे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत शुक्रवारी ,१२ सप्टेंबर रोजी याबाबतची सूचना जारी करण्यात आली आहे. यंदा ई - पिक पाहणीसाठी १ ऑगस्ट ते १४सप्टेंबर असा कालावधी देण्यात आला होता. मात्र या कालावधीत राज्यात अनेक ठिकाणी पावसाअभावी दुबार पेरणीचे संकट उद्भवले. तर अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली. तसेच अनेक जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोबाईल नेटवर्क आणि इतर कारणांमुळे शेतकर्यांना पिक पाहणी करता आली नाही. त्यामुळे आज रोजीपर्यंत पिक नोंदणी न झालेल्या शेतकर्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे शेतकर्यांना ई - पिक पाहणीसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय महसूल विभागाच्या वतीने घेण्यात आला असून त्यानुसार आता येत्या २० सप्टेंबरपर्यंत सहा दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. शेतकर्यांनी लवकरात लवकर ई - पिक पाहण्याची नोंदणी करण्याचे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.